Spread the love

हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा
विशेष कार्यकारी अधिकारी पदावरुन हातकणंगलेतील भाजपमध्ये खदखद सुरु झाली आहे. यावरुन निष्ठावंत गट आक्रमक झाला असून कार्यकर्त्यांनी थेट खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे तक्रार केली आहे. याची वेळीच गंभीर दखल घेतली गेली नाही तर लवकरच मोठा विस्फोट होण्याची लक्षणे या निमित्ताने दिसू लागली आहेत. तर मिशन टायगरची येथेही सुरवात होवू शकते असा इशाराही या निमित्ताने दिल्याचे कळते.
शहरी चेहरा असलेल्या भाजपची पाळेमुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी घरादाराचा विचार न करता भाजपला घराघरात पोहचवले. त्यावेळी लोक आम्हाला हिनवत होते. तरी याकडे लक्ष न देता पक्षवाढीसाठी निष्ठेने काम केले. मात्र आलिकडच्या काळात सत्ता आल्यापासून काही मंडळी स्वार्थासाठी भाजपमध्ये आलेले असून पक्ष त्यांच्याच इशारा चालत आहे. अशी हातकणंगलेत परिस्थिती आहे. 30 ते 35 वर्षापासून भाजपाशी एकनिष्ठ राहीलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून अलिकडेच भाजपात आलेल्यांना कार्यकारणीत महत्वाचे स्थान दिलेले आहे. तर विशेष कार्यकारी अधिकारी पदे देतानांही निष्ठावंताना डावलण्यात आलेले आहे. अशी तक्रार महाडिकांकडे केली आहे.

वेगळा विचार करण्याची वेळ येवू देवू नका

पाच वर्षांपूर्वी झालेल्या हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचे पाच सदस्य निवडून आले. 1995 ला भाजपाचा फलक लावलेले अनेक कार्यकर्ते येथे आहेत. त्यांना डावलून आत्ता नव्याने भाजपात आलेल्या कार्यकर्त्यांना पदे बहाल करत असाल तर वेगळा विचार करण्याची मानसिकता निष्ठावंतांची होवू शकते असेही निवेदनात म्हटले आहे.

अन्याय थांबला पाहिजे


गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भाजपाशी एकनिष्ठ आहोत. मात्र नव्यानेच पदे घेतलेल्यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्यावरच अन्याय केला आहे. हे कुठंतरी थांबल पाहिजे हीच आमची भूमिका आहे.
– संजय दुग्गे, शहराध्यक्ष