Spread the love

संजय राऊतांचे चॅलेंज

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीनंतर आगामी राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ऑपरेशन टायगर आणि भाजपवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, शिंदे गटाचं कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर. उद्या सत्ता नसेल तर यांचं अख्खं दुकान खाली होईल. मी मागेही म्हणालो होतो की, दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाहही आमच्या पक्षात प्रवेश करतील. दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीत येऊन प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
विकृत, सूडबुद्धीने सत्ता राबवली नाही
ऑपरेशन टायगरचं आम्हाला काय सांगता? ईडी हातात आली की बावनकुळ्यांपासून सर्व तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील. सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्हीही भोगली आहे. आम्हीही सत्तेत होतो. पण इतक्या विकृत पद्धतीने सूडबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.
चेंगराचेंगरीत अधिक बळी, सरकारकडून लपवाछपवी
दरम्यान, दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. मृतांचा सरकारी आकडा 30 आहे. माझ्या माहिती प्रमाणे किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत. सरकार आकडा लपवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी म्हटले की, महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून ज्या पद्धतीने निमंत्रण दिलं जात आहे, जणू हा भाजपचाच सोहळा आहे. तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था असल्याचे लोकांना भासवले जात आहे. पण प्रत्यक्षात तिथे काहीच नसून इतकी अव्यवस्था कोणत्याच महाकुंभ मेळ्यात झाली नव्हती असेही राऊत यांनी म्हटले.