Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
विधानसभेनंतर आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‌‍वभूमीवर काही दिवसांपासून शिवेसेना ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत. ठाकरे गटाला खिंडार पडत असल्याचं चित्र आहे. ठाकरे गटातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच नुकतंच कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलं आहे. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कोकणातील 3 बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रामध्ये म्हटलंय की, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आल्याचं पत्रकातून कळवण्यात आलं आहे.