Spread the love

प्रतिनिधी /महान कार्य वृत्तसेवा
सोशल मिडीयावर बहिणीला फॉलो केल्याच्या कारणावरुन दोन गटात फरशी आणि शस्त्रासह जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्हीकडील दोघेजण जखमी झाले असून यश दिलीप काटकर (वय 20 रा. माळभाग कबनुर) आणि प्रितम प्रकाश शेटके (रा. साठेनगर कबनूर) अशी त्यांची नांवे आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी दोन्ही गटातील मिळून एका अल्पवयीनसह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दोन्हीकडील चौघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने तिघांना 17 फेब्रुवारीपर्यंत तर एकास 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, यश दिलीप काटकर याने दिलेल्या फिर्यादीत कबनूर येथील फॅक्टरी रोडवरील शिवाजी कॉर्नर येथे प्रितम शेटके व प्रकाश  शेटके हे थांबले असताना त्याठिकाणी आलेल्या यश काटकर याने बहिणीला इन्स्टाग्रामवर फॉलो का करतोस अशी विचारणा केली. त्यावर प्रितम याने यश याला धक्काबुक्की करत कानशिलात मारले. तर  प्रकाश शेटके यांनी यश याच्यावर तलवारीने वार केला. परंतु यश खाली झुकल्याने तलवारीच्या वाराने यश याच्या डाव्या बाजूच्या कानाची पळी तुटली. त्यामध्ये यश हा जखमी झाला असून त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी यश याच्या फिर्यादीवरुन प्रितम व प्रकाश  शेटके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर प्रकाश वसंत शेटके (वय 57) यांच्या फिर्यादीनुसार जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत यश दिलीप काटकर, योगेश बाजीराव कांबळे, शुभम प्रकाश पवार, लकी खान व एक अल्पवयीन अशा पाचजणांनी प्रितम शेटके याला मारहाण केली. त्यामध्ये यश याने प्रितम याच्या डोके, डोळा व तोंडावर फरशीने वार केल्याने तर अन्य साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी व दगडांनी केलेल्या मारहाणीत प्रितम हा जखमी झाला आहे. प्रकाश शेटके यांच्या फिर्यादीवरुन पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणात योगेश कांबळे, शुभम पवार, प्रकाश शेटके यांच्यासह चौघांना अटक केली आहे. तर एकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस निरिक्षक सचिन पाटील यांनी दिली.