मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने दाखल होताच शेजारी एक ड्रोन उडताना पाहून पोलिसांची तारांबळ उडाली. यानंतर घटनास्थळी पोलिसांची एकच धावपळ सुरु झाली आणि एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. यावरुन संजय शिरसाट यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या जीवाला जो धोका आहे तो अजूनही टळलेला नाही. त्यामुळे काल जो ड्रोन उडाला आहे याबाबत सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे. निश्चित हा घातपाताचा प्रकार आहे असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी नाशिक जिल्ह्याच्या आभार दौऱ्यावर होते. मुंबईवरून ते हरसुल येथे हेलिकॉप्टरने उतरत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरच्या शेजारी एक ड्रोन उडत होता. आदिवासी डोंगराळ भाग असल्याने अनेक ठिकाणी मोबाईलला रेंज नाही तर काही ठिकाणी पोहोचणे अवघड होते. अशामध्ये पोलिसांनी तातडीने ड्रोन चालकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आहे. हरसुलला उतरून एकनाथ शिंदे हिवाळी गावातील शाळेला भेट देण्यासाठी गेले.
एकनाथ शिंदे यांनीही ड्रोन उडवणाऱ्याची पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली. संजय शिरसाट यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ”एकनाथ शिंदे नगर विकासमंत्री असताना देखील त्यांना अनेक धमक्या आल्या आहेत. ठाण्यात काही लोक पकडले गेले होते. एकनाथ शिंदे यांच्या जीवाला जो धोका आहे तो अजूनही टळलेला नाही. त्यामुळे काल जो ड्रोन उडाला आहे याबाबत सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे. निश्चित हा घातपाताचा प्रकार आहे”.
