नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या पराभवानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) अरविंद केजरीवाल याचे सरकारी निवास्थान राहिलेल्या 6, फ्लॅगस्टाफ रोडवरील बंगल्यातील पुनर्बांधणीसाठी झालेल्या खर्चाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या बंगल्याचा ‘शीशमहल’ असा उल्लेख करत भाजपाकडून या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सीव्हीसीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला (सीपीडब्लूडी) 40,000 वर्ग यार्ड (8 एकर) मधील बंगल्याच्या बांधकामादरम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात आल्यासंबंधीच्या सर्व आरोपांची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
भाजपा नेते विंजेंद्र गुप्ता यांनी तक्रार दिल्यानंतर सीपीडब्लूडीकडून अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय मुख्यमंत्री निवासस्थानाबद्दल वस्तुस्थिती आधारित रिपोर्ट सादर केल्यानंतर सीव्हीसीने 13 फेब्रुवारी रोजी चौकशीचे आदेश दिले होते. 14 ऑक्टोबर 2024 रोजी विजेंद्र गुप्ता यांनी 6, फ्लॅगस्टाफ रोड येथील दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी अवैध बांधकाम केल्याप्रकरणी सीव्हीसीकडे तक्रार दाखल केली होती.
