स्थानिक राजकारणाचा परिणाम
प्रविण पवार/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून प्रशासक पदाचा पदभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. आता ही जबाबदारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश बुधवारी काढले. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पध्दतीने एखाद्या अधिकाऱ्याला पदोच्युत करणे ही पहिलीच घटना असावी. जिल्हाधिकारी यांच्याकडे मोठा व्याप आहे. त्यातच आता त्यांच्यावर इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आल्यामुळे ते या पदाला कितपत न्याय देवू शकतात, हे पहावे लागेल. तथापी, आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचा येथे स्थानिक राजकारणाने बळी घेतल्याचे लोक बोलत आहेत.
खा. धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या विशेष प्रयत्नाने शहराला महापालिकेचा दर्जा मिळाला. तेव्हापासून महायुतीमधीलच अंतर्गत राजकीय कुरघोड्या सुरू झाल्या. महापालिकेचे पहिले आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी येथील स्थानिक राजकारणाला वैतागुन बदली करून घेणं पसंद केले. त्यानंतर ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे महापालिकेची सूत्रे सोपविण्यात आली. प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. राजकिय नेत्यांच्या दबावाला बळी न पडणारा अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. इचलकरंजी महापालिकेचा त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर अनेक प्रलंबित प्रकरणे त्यांनी मार्गी लावली. प्रसंगी राजकिय दबाव झुगारून त्यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरात त्यांची लोकप्रियता वाढली. हेच कुठेतरी स्थानिक राज्यकर्त्यांना खटकू लागले. यातूनच त्यांच्याकडून सत्ता पक्षाच्या बळाचा वापर करून त्यांच्याकडून प्रशासक पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. आता पहावे लागेल जिल्हाधिकारी अमोल येडगे इचलकरंजीकरांना किती न्याय देतात.