मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त करण्यासाठी राज्य सरकार राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबवणार आहे, याबाबत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हे कॉपीमुक्त अभियान राबवण्याचे आदेश दिलेत. तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी ड्रोनचीही परीक्षा केंद्रावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी आता विद्यार्थ्यांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर राहणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा कधी? : प्रत्येक वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतात. राज्यात यावर्षी उच्च माध्यमिक बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान होणार आहे. तर राज्य माध्यमिक इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च यादरम्यान होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी इयत्ता दहावी आणि बारावीचे परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त आणि चांगल्या वातावरणात परीक्षा पार पाडाव्यात, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने प्रयत्न करावेत, असे आदेश दिलेत. याबाबत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी बैठक घेत आढावा घेतलाय. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी, कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी ड्रोनची नजर ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.
गैरप्रकार टाळण्यासाठी कोणते आदेश?
– परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर ड्रोनची करडी नजर ठेवण्यात यावी
– जिल्हा प्रशासनातर्फे परीक्षा केंद्राबाहेर व्हिडीओ चित्रीकरण करावे
– परीक्षा सुरू होण्याआधी 1 दिवस परीक्षा केंद्राचा सर्व सुविधाबाबत आढावा घ्यावा
– सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके नियुक्त करावीत
– परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून चेहरा पडताळणी व्यवस्था (फेस रेकग्निशन सिस्टम) तैनात करण्यात यावी
– परीक्षा केंद्रावर संबंधितांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात यावे
– परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गुन्हा दाखल करावा
– परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवावे
– परीक्षा केंद्रांच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात यावे
![](https://emahankarya.com/wp-content/uploads/2025/02/exam.jpg)