शिवनाकवाडी/ विकास लवाटे
शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे यात्रेच्या दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी रात्रीपर्यंत 611 रुग्णांना उपचार देण्यात आले होते, तर गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ही संख्या 1,080च्या वर गेली आहे. विषबाधेमुळे वृद्ध रुग्णांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.
गुरुवारी सकाळी शिरदवाड येथील 30 रुग्ण इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात हलवण्यात आले, तसेच कर्नाटकातील मानकापूर येथील सुमारे 50 रुग्णांना शिवनाकवाडी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग संपूर्ण यंत्रणेसह कार्यरत आहे.
68 जणांचे वैद्यकीय पथक 24 तास सेवेत
सध्या शिवनाकवाडी आरोग्य केंद्रासह इतर रुग्णालयांमध्ये 68 जणांचे वैद्यकीय पथक तैनात असून, तीन शिफ्टमध्ये 24 तास आरोग्य सेवा दिली जात आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जात असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, बुधवारी उपचार घेतलेल्या काही रुग्णांना पुन्हा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली.
नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
यात्रेच्या ठिकाणी मिळालेल्या अन्नामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, नागरिकांनी शिळे अन्न टाळावे, पाणी उकळून प्यावे आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच, कोणालाही त्रास जाणवत असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची दखल घेण्यात आली असून, प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.