Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांनी मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असताना तब्बल 88 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप दमानिया यांनी केला. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अंजली दमानिया यांची ही पत्रकार परिषद सुरु झाली. ही पत्रकार परिषद संपत असतानाच धनंजय मुंडे हे तातडीने अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अंजली दमानिया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी दुपारी मंत्रालयात बैठक आहे. या बैठकीपूर्वीच धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या नव्या आरोपांसंदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतली असावी, अशी चर्चा आहे. यापूर्वी संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग किंवा त्यांच्यावर कोणताही थेट आरोप नसल्यामुळे अजित पवार यांनी धनुभाऊंना अभय देत त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास नकार दिला होता. मात्र, आता अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना त्यांच्या खात्यात झालेल्या कथित गैरव्यवहाराची कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यासोबत अजित पवार आणि महायुती सरकारची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून नुकताच बीडचा दौरा केला होता. यावेळी अजित पवार यांनी स्वपक्षीयांना कानपिचक्या दिल्या होत्या. तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे बजावले होते. तसेच अजितदादांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपलं चारिर्त्य स्वच्छ ठेवण्याचाही सल्ला दिला होता. मात्र, आता अंजली दमानिया यांनी कृषी खात्यातील खरेदीत घोटाळ्याचे आरोप केल्याने धनंजय मुंडे यांची प्रतिमा मलीन झाली आहे. धनंजय मुंडे या सगळ्याला कशाप्रकारे उत्तर देणार, हे बघावे लागेल. परंतु, आता थेट आरोप झाल्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठीचा दबाव आणखी वाढल्याचे दिसत आहे.
महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याचे केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले. महाबीज, केव्हीके आणि एमएआयडीसीच्या योजनांचे पैसे डीबीटी मार्फत न देता उपकरणांच्या खरेदीसाठी टेंडर काढण्यात आले. या टेंडरमध्ये बाजारभावाच्या दुप्पट दराने वस्तुंची खरेदी करण्यात आली. त्यासाठी धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा करून डीबीटी घटकांच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्या. या सगळ्याच्या माध्यमातून किमान 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला.