Spread the love

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता आपला महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा येत्या 2 दिवसात कुस्तीगीर परिषदेला परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावर 2009 साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अन्याय झाला होता अशी पै. काका पवार यांनी एका वृत्तवाहिनीच्या शोमध्ये कबुली दिली. यानंतर चंद्रहार पाटील यांनी आपल्या दोन वेळच्या महाराष्ट्र केसरीच्या गदा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला परत देण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्याला ठरवून तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ दिले नसेल हे आता सिद्ध होतेय. अशा पध्दतीने कुस्ती स्पर्धामध्ये अनेक वर्षांपासून राजकारण होत आहे. त्याचा फटका पैलवानांना बसतो आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र केसरीच्या दोन जिंकलेल्या गदा परत करणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय. पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला समोर जावं लागलं. त्यामुळे पंच कमिटीने माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या. तर त्याचं मला समाधान वाटेल, असंही चंद्रहार पाटील म्हणाले. येत्या 2 दिवसात कुस्तीगिरी परिषदेला परत देणार असल्याचं चंद्रहार पाटलांनी जाहीर केले आहे. पंचांच्या एका निर्णयामुळे शिवराज राक्षेचं आयुष्य खराब झालं, असा आरोपही चंद्रहार पाटील यांनी केला. दरम्यान, शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारण्याच्या घटनेवरून पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असं म्हणत चंद्रहार पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
…त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो- चंद्रहार पाटील
सामना संपल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर थेट लाथ मारली. आता या घटनेवर आजी-माजी कुस्तीपटू आणि पंचांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया मोठी दिली आहे. शिवराज राक्षेने लाथ घातली ही चूक झाली. पण जो कालच्या सामन्यात पंच होता, असल्या पंचाना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले. पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यावेळी शिवराज राक्षेने लाथ मारून चूक केली, खरं तर त्याने पंचाना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो, त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो.