रायगड/ महान कार्य वृत्तसेवा
येत्या एक दोन दिवसात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटेल. मुख्यमंत्री आणि दोन्हीं उपमुख्यमंत्री यांची यावर चर्चा झाली आहे. त्यांच्यात यावर खूप चर्चा झाली आहे. भरत गोगावले यांचा स्वरूपात रायगडला पालकमंत्री पद मिळेल. एकनाथ शिंदे यांचं सुध्दा भरत गोगावले यांनाच पालकमंत्री पद मिळावं अस मत आहे. भरत गोगावले हे चार टर्मचे आमदार आहेत. शिवाय ते अन्यायाविरुद्ध लढणारे आहेत. गोगावले पालकमंत्री होण्यासाठी सर्वांची यांबाबत अपेक्षा असून येत्या दोन दिवसात वरिष्ठ स्तरावर पालकमंत्री पदाबाबत निर्णय घोषित होईल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.
सुनील तटकरे यांनी पालकमंत्री पद मागणे हे ठीक नाही
दरम्यान, राष्ट्रवादीत अजूनही पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे का? असा प्रश्न आमदार महेंद्र दळवी यांना केला असता त्यावर ते म्हणाले की, प्रोटोकॉलनुसार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री पद मागणे हे ठीक नाही. शेवटी रायगडच्या जनतेनी भरत गोगावले यांच्या रूपाने न्याय दिला आहे. सुनील तटकरे कधीच मोठ मन करत नाहीत, असे म्हणत दळवी यांनी थेट सुनील तटकरेंवर घणाघात केला आहे. सुनील तटकरे हे स्वार्थापोटी निर्णय घेतात. आता असं अजिबात चालणार नाही असेही महेंद्र दळवी म्हणाले. रायगडची जनता आता हा निर्णय अजिबात स्विकारणार नाही. रायगडची जनता आता फक्त भरत गोगावले यांनाच स्वीकारतील असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे जे ठरवतील तो निर्णय मला मान्य- भरत गोगावले
एकनाथ शिंदे जे ठरवतील तो निर्णय मला मान्य. लवकरच निर्णय लागेल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरुन होतं असलेल्या वादाच्या चर्चेवर त्यांनी आपली प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. या संदर्भात वरिष्ठ नेते बसून चर्चा करत आहेत. उपमुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने चर्चेला उशीर झाला. दरम्यान संजय शिरसाट यांचं ते वक्तव्य वैयक्तिक आहे. त्याबाबत एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. असेही म्हणत संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.