संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
येथील दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सह. साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होवून २२ दिवसांचा कालावधी लोटला तरीही केंद्रीय सहकार प्राधिकरणाने बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांच्या यादीवर मोहोर न उटविल्यामुळे कारखान्याचा कारभार विना कारभारी सुरू आहे. ही प्रक्रिया दिवसेंदिवस लांबत चालल्यामुळे कारभारी अस्वस्थ असून रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचारांचे खरे वारसदार ज्येष्ठ नेते पी. एम. पाटील यांच्या वर्तुळात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. कदाचित आण्णांच्या कन्या रजनीताई मगदूम यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे त्यांनी थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेवून गाऱ्हाणे मांडले असावेत आणि त्यामुळेच ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे का? अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.
हातकणंगले, शिरोळ आणि सीमा भागातील शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना असावा यासाठी दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी कबनूर, कोरोचीच्या माळरानावर पंचगंगा कारखान्याची स्थापना केली. या परिसरातील शेतकऱ्यांना हक्काची संस्था मिळावी म्हणून आण्णांनी अतिशय मोठ्या कष्टातून हा कारखाना उभा केला. आण्णांच्या निधनानंतर त्यांची कन्या रजनीताई मगदूम यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आली. परंतू, त्यांच्याकडे व्यवस्थापन कौशल्याचा अभाव असल्यामुळे त्यांना कारखान्याची सूत्रे त्यांच्याकडे राखता आली नाहीत. त्यावेळी त्यांनी गडहिंग्लज कारखान्याचे तत्कालीन चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर यांचा सल्ला त्यांना योग्यरितीने हाताळता आला नाही, अशी चर्चा त्यावेळी होती. यातूनच आण्णांच्या विचारांचे वारसदार पी.एम.पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळात बंड झाले आणि रजनीताई मगदूम यांना प्रभात नगरात जावं लागलं. तेव्हापासून या कारखान्याचे नेतृत्व पी.एम.पाटील यांच्याकडे आले आहे. अतिशय अडचणीच्या काळात पी.एम.पाटील यांनी कारखाना चालवायला देवून अस्तित्व ठेवलं. त्यामुळेच आण्णांचे खंदे समर्थक गेली १५ वर्षापासून त्यांच्या पाठीशी राहिले.
यंदाची निवडणूक विशेष अर्थाने गाजली. या निवडणुकीत आण्णांच्या कन्या रजनीताई यांचाच उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. यावेळी आण्णांवर जिवापाड प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते हळहळले. पण निवडणूक प्रक्रियेत ‘ज्याच्या हातात ससा, तोच पारधी’ या म्हणीप्रमाणे पी.एम.पाटील पारधी ठरले. परंतू, त्यानंतर अनेक पडद्यामागून नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या. संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असलीतरी चेअरमन निवड मात्र पध्दतशीरपणे लांबणीवर जात आहे. हा कारखाना मल्टीस्टेट कायद्याखाली नोंदणी असल्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय सहकार प्राधिकरणाकडून संचालक मंडळाच्या यादीवर मोहोर उटने आवश्यक आहे. परंतू आज २२ दिवस झाले तरी केंद्राने या संचालक मंडळास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे एकूणच या राजकारणात वेगळाच वास येवू लागल्याची चर्चा गंगानगरमध्ये आहे. एकूणच या लांबत असलेल्या प्रक्रियेमुळे पी.एम.पाटील गटात मात्र कमालीची अस्वस्थता दिसत आहे.
