पुणे/महान कार्य वृत्तसेवा
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण हे वाढत आहेत. शहरात या आजाराचे 127 रुग्ण आढळून आले आहे तर दोन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे शहरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू – पुणे विभागात दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे पुण्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि काल जीबीएसमुळे दुसरा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात राहात असलेल्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही मृत महिला कॅन्सरग्रस्त होती. तसंच 15 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुण्यातील नांदेड गावातील ज्या विहिरीतून हा आजार वाढला असल्याचं सांगितलं जातं आहे, त्याठिकाणी आता महापालिका, राज्य शासन तसंच केंद्र सरकारचं पथक येऊन पाहणी करत पाण्याची चाचणी करत आहे.
जीबीएस आजाराविषयी – हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आजार आहे जिथे शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवर हल्ला करते. स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो आणि गंभीर आजारांमध्ये अर्धांगवायू होतो. आजपर्यंत या आजाराचे एकूण 127 रुग्ण सापडले आहेत. तसंच 2 संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 72 रुग्णांची निदान निश्चिती देखील झाली आहे. यापैकी 23 रुग्ण पुणे मनपा तसंच 73 रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहेत. तर 13 रुग्ण पिपंरी चिंचवड मनपा तसंच 9 रुग्ण पुणे ग्रामीण आणि 9 इतर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. तर यापैकी 20 रुग्ण हेंटीलेटरवर आहेत.
