Spread the love

वॉशिंग्टन/वृत्तसेवा
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसजवळ प्रवासी विमानाची अमेरिकन सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरशी टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या विमानात 60 प्रवासी होते. भीषण अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
विमान कॅन्सस सिटीहून वॉशिंग्टनला जाताना हेलिकॉप्टरशी धडकल्यानंतर कोसळले. विमानाचे पोटोमॅक नदीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अमेरिकेच्या वेळेनुसार हा अपघात बुधवारी संध्याकाळी घडला. या अपघातानंतर विमानाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमान अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोटोमॅक नदीत बचावकार्य सुरू केलं आहे. नदीतून प्रवाशांचे 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार वॉशिंग्टन डीसीमधील रेगन राष्ट्रीय विमानतळाजवळ धावपट्टीजवळ 60 प्रवासी आणि चार क्रू मेंबर असलेल्या प्रवासी विमानानं सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरला धडक दिली. पेंटागॉन आणि सैन्यदलाकडून अपघाताची चौकशी सुरू आहे, असे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करून दु:खद अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली.
13 जानेवारी 1982 रोजी पोटोमॅकमध्ये एअर फ्लोरिडामध्ये विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. त्यावेळी अपघातात 78 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा खराब हवामामुळे अपघात झाला होता. अमेरिकेतील व्यावसायिक विमान कंपनीचा 2009 मध्ये न्यू यॉर्कमधील बफेलोजवळ भीषण झाला होता. त्यावेळी प्रोपेलर विमानातील सर्वजण मृत्युमुखी पडले होते. मृतामध्ये 45 प्रवासी, 2 पायलट आणि 2 फ्लाइट अटेंडंट यांचा समावेश होता. जमिनीवर असलेल्या आणखी एका व्यक्तीचाही मृत्यू झाला होता.