Spread the love

पालघर/ महान कार्य वृत्तसेवा
शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी हे मागील अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत. मागच्या अकरा दिवसांत पोलिसांना धोडी यांचा कसलाही थांगपत्ता लागला नाहीये. अशोक धोडी नेमके कुठे आहेत? त्यांच्यासोबत नक्की काय घडलं? याची याबद्दल पोलिसांनी अद्याप कोणतीही लीड मिळत नव्हते. अखेर अकराव्या दिवशी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरणप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. धोडी यांच्या अपहरण प्रकरणात वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या आरोपींचा सहभाग असल्याचा खुलासा पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. अटक आणि फरार आरोपींविरोधात घोलवड पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यातील आरोपी अटक झाल्यानंतर पुढील माहिती प्राप्त होईल, असं बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे.
पाच ते सहा आरोपींनी धोडी यांचं केलं अपहरण
घटनेच्या दिवशी 20 जानेवारीला अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. आपण डहाणूवरून घरी येत असल्याचं त्यांनी पत्नीला सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. तेव्हापासून अशोक धोडी यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. पाच ते सहा आरोपींनी धोडी यांचं अपहरण केल्याचा संशय पोलिसांना होता. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार होते. आता पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील दोन आरोपी हे राजस्थानला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. अटक केलेल्या आरोपींचा या प्रकरणात नेमका सहभाग काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
अशोक धोडी हे परराज्यातून होणाऱ्या दारू तस्करीत अडचण ठरत होते. याच कारणातून त्यांचं अपहरण करून त्यांच्यासोबत घातपात केल्याचा संशय पोलिसांना आहे. दारू तस्करीतून संशयित आरोपींनी कोट्यावधींची माया जमवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घोलवड पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.