Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
गेल्या काही वर्षांत अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच स्मार्टफोनचे वेड लागले आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर अनेक शाळकरी मुलांच्या हाती पहिल्यांदा स्मार्टफोन पडले. दिवसेंदिवस स्मार्टफोन वापरणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची संख्या वाढत आहे. पण हे मुले स्मार्टफोनवर काय पाहतात? स्मार्टफोनचा वापर कशासाठी करतात, याबाबतचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील बहुसंख्य मुले स्मार्ट फोनचा वापर मनोरंजनासाठी करत असल्याचं समोर आले आहे. तुलनेत मुली फॅक्ट सर्च करण्यासाठी फोनचा वापर करत असल्याचं दिसून आले आहे.
2024 च्या ASER सर्वेक्षणानुसार, घरी स्मार्टफोन असलेल्या मुलांनी स्मार्टफोनचा वापर व्हिडिओ शेअर करणं आणि पाहणे अशा मनोरंजन करणाऱ्या गोष्टींसाठी फोनचा वापर केला. तर मुलींनी मात्र माहिती मिळवण्यासाठी फोनचा वापर केल्याचं दिसून आलं. ASER च्या अहवालानुसार, 14 ते 16 वर्षे वयोगटातील विद्यार्थी असलेल्या 94.2% कुटुंबांकडे स्मार्टफोन होते. पण या कुटुंबातील 65.5% मुलींनीच फोनचा ॲक्सेस होता. तुलनेत मुलांना फोनचा ॲक्सेस असणाऱ्यांची संख्या जास्त होती. 74.1 टक्के मुलांना घरातील फोनचा ॲक्सेस होता. या सर्वेक्षणासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये 22.6% मुलांकडे आणि 15.5% मुलींकडे स्वत:चा स्मार्टफोन होता.
14 ते 16 वर्षे वयोगटातील 72.7% मुले सोशल मीडियासाठी फोनचा वापर करत होती. तर 63.3% मुले अभ्यासासाठी फोन वापरत होती, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. मुलींच्या तुलनेत मुलं अभ्यासाठी कमी आणि मनोरंजनासाठी अधिक फोनचा वापर करत असल्याचं सर्वेक्षणातून दिसून आले आहे. 75.1 % मुलं आणि 70 % मुली फोनचा वापर मनोरंजनासाठी करत होते. अभ्यासाच्या बाबतीत 65.1 टक्के मुली फोनचा वापर अभ्यासाठी किंवा फॅक्ट सर्च करण्यासाठी करत असल्याचं दिसून आलं. मुलांच्या बाबतीत ही आकडेवारी 61.6 टक्के इतकी आहे.
या सर्वेक्षणावर भाष्य करताना महाराष्ट्र राज्य स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख प्रथम सोमराज गिरडकर यांनी सांगितलं की, हा डेटा सामाजिक पितृसत्ता अधोरेखित करतो. हे असंही दर्शवतं की मुली बहुतेक सरकारी शाळांमध्ये आणि मुले खासगी संस्थांमध्ये प्रवेश घेतात. ग्रामीण महाराष्ट्रात, अजूनही अनेक कुटुंबे मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्यास कचरतात. याच मानसिकतेमुळे मुलींकडे कमी सेलफोन आहेत. यामागे दोन प्रमुख कारणं आहेत, पहिलं कारण म्हणजे पालक मुलांना प्राधान्य देत आहेत, दुसरे म्हणजे फोनमुळे मुली बिघतील, त्यांची दिशाभूल होईल, असे पालकांना वाटते, त्यामुळे पालक मुलींना फोन देण्यास कचरतात. मात्र आता हळुहळू मानसिकता बदलत आहे,” असेही गिरडकर म्हणाले.