नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
महाकुंभ मेळाव्यातील दुर्घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी महाकुंभ मेळाव्यातील व्हीआयपीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.
राहुल गांधी यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, ”प्रयागराज महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाल्याचं वृत्त अत्यंत दु:खद आहे. मी शोकाकुल कुटुंबांबाबत माझ्या मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो जखमींची तब्येत लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करतो.”
व्हीआयपी संस्कृतीला आळा घाला- राहुल गांधी महाकुंभ मेळाव्यातील व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, ” या दु:खद घटनेला व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा, सामान्य भाविकांपेक्षा व्हीआयपीकडे प्रशासनाचे विशेष लक्ष देणं या गोष्टी जबाबदार आहेत. महाकुंभाचे आणखी बरेच दिवस आहेत. तसेच बरेच महास्नान होणार आहेत. आजसारखी दु:खद घटना भविष्यात घडू नये, यासाठी सरकारनं महाकुंभ मेळाव्यातील व्यवस्था सुधारली पाहिजे. व्हीआयपी संस्कृतीला आळा घालून सामान्य भाविकांसाठी चांगल्या व्यवस्था केल्या पाहिजेत.”
फक्त बँडिंग आणि मार्केटिंगवर खर्च- उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष अजय राय म्हणाले, ”प्रयागराजमध्ये कुंभ आणि अर्धकुंभ अनेक वेळा आयोजित करण्यात आले आहेत. परंतु अशी अराजकता यापूर्वी कधीही घडली नाही. योगी सरकारनं सर्व पैसे फक्त बँडिंग आणि मार्केटिंगवर खर्च केले आहेत. येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेवर पैसे खर्च केले नाहीत. महाकुंभाबाबत सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. अशा घटनांबद्दल आम्ही सतत लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु सरकार आणि प्रशासनानं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही.”
व्हीआयपीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे- मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं, ”महाकुंभमेळ्यादरम्यान, संगमाच्या काठावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेसाठी अर्धवट व्यवस्था, व्हीआयपी, व्यवस्थापनापेक्षा स्वत:च्या जाहिरीतावर अधिक लक्ष केंद्रित करणं या गोष्टी जबाबदार आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करूनही अशी व्यवस्था आहे. महाकुंभ मेळाव्यातील व्हीआयपीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे.”