संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
राज्य सरकारने एस.टी.च्या प्रवासी भाड्यात नुकतीच वाढ केली. मात्र हे करीत असताना तिकिटातील विषम दराने सुट्ट्या पैशांचा प्रचंड गोंधळ उडत आहे. यातून प्रवासी आणि वाहकांमध्ये खडाजंगी होत आहे. त्यामुळे वाहक अक्षरश: वैतागून गेले आहेत. सदरची लादलेली भाडेवाढ किमान सम संख्येत करावी, जेणेकरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद टळले जातील, आणि लालपरीचा प्रवास सुखकर होईल, अशी मागणी पुढे येत आहे.
राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. यामुळे अनेक योजना बंद केल्या जात आहेत. तर महिला वृद्धांसाठी सवलतीच्या दरात एस.टी. प्रवास सुरु केला. त्यामुळे प्रवाशांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरात सवलत देऊनही गाळात अडकलेली एस.टी. मार्गावर आली. परंतु अन्य योजनांची तुट भरुन काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने भाडेवाढ करुन प्रवाशांना धक्का दिला. या भाडेवाढीचा विपरीत परिणाम मात्र दररोजच्या वादावादीतून दिसून येत आहे.
कोल्हापूर-जयसिंगपूर मार्गावर 71 रुपये, अशी विषम भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ करीत असताना समप्रमाणात करणे आवश्यक असते. 1 आणि 2 रुपयांची भाडेवाढ करण्यात आल्याने सुट्ट्या पैशांचा ताण वाहकांवर पडत आहे, अशीच परिस्थिती कोल्हापूर-सांगली या मार्गावरची आहे. या प्रवासासाठी 70 रुपये मोजावे लागत होते. नव्या भाडेवाढीने आता 81 रुपये मोजावे लागत आहेत. 100 रुपयांची नोट वाहकाला दिली, तर 19 रुपये परत देणार कुठून. सध्या बाजारात सुट्ट्या पैशांची चणचण आहे. त्यातच या विषम संख्येतील भाडेवाढ डोकेदूखी ठरत आहे.
ऑनलाईन पेमेंटवर मर्यादा
एस.टी.ने प्रवास करणारा वर्ग हा बहुतांशी ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य वर्गातील आहे. विशेषत: महिला आणि जेष्ठ नागरीकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांना ऑनलाईन पेमेंट करण्यात अडचणी येतात. त्यामुळेच समप्रमाणात तिकिटाचे दर आकारावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडू लागले असताना महामंडळाने सम प्रमाणात भाडेवाढ करण्याची गरज आहे. तरच वाहक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग टळणार आहेत.