Spread the love

रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने भुवया उंचावल्या!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यानंतर पवार कुटुंबात दुरावा वाढल्याचे दिसून आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंब पहिल्यांदाच आमनेसामने आल्याचे दिसून आले. मात्र, मागील महिन्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तसेच गुरुवारी (दि. 23) पुण्यातील एका कार्यक्रमात काका-पुतणे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. यावरून शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आमदार रोहित पवार हे आज गुरुवारी (दि. 23) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत रोहित पवार यांना अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कुटूंब म्हणून एकत्र आले पाहिजे हे वाटते. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येणे अवघड आहे. एका पक्षाला विचार सोडावे लागतील तर दोन्ही पक्ष एकत्र होतील. पवार साहेब एक विचार घेऊन पुढे जात आहेत. पण अजित दादा आणि शरद पवार दोन्ही मोठे नेते आहेत, ते याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणे टाळले?
दरम्यान, आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून आलं. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्यानुसार अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, त्यांच्या जागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.