Spread the love

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून शिंदे गट महायुतीत सामील झाला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार आणि 12 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. संख्याबळाच्या जोरावर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष मिळाला, आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या ग्रीन सिग्नलनंतर ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या पक्षप्रवेशाबाबत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हे खासदार शिंदे गटात जाऊ शकतील, अशीही माहिती मिळत आहे. या सहा खासदारांमध्ये पाच खासदार ग्रामीण भागातील तर एक खासदार मुंबईतील असल्याची माहिती आहे.
आज पक्षप्रवेश होणार होता पण..
शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वीपणे राबवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज पक्षप्रवेश होणार होता. मात्र तो कायदेशीर कारणामुळे टाळण्यात आला असून तो पुढे होणार आहे, अशीही माहिती मिळत आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती, याच कार्यक्रमाच्या मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश होणार होता, मात्र कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती, त्यामुळे आजचा पक्षप्रवेश टाळला आहे. उद्या अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली आहे.
खरं तर, राज्यात 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गट बाहेर पडला होता. त्यानंतर राज्यात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी दोन गट झाले होते. या घटनेनंतर लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली होती. मात्र राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिंदे गटाने मोठा विजय मिळून खरी शिवसेना आपली असल्याचे दाखवून दिले होते. लोकसभेत ठाकरेंनी 21 जागा लढवत 9 खासदार निवडून आणले होते. आता या 9 पैकी 6 खासदार फुटणार असल्याची माहिती आहे.