Spread the love

नगरपंचायतीचे दुर्लक्ष; दस्त नोंदणी ते सातबारावर नांव नोंदविण्यासाठी मोठ्या ‌‘अर्थपूर्ण’ घडामोडी

हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले शहराला नरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाकडून विविध प्रयोजनांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले. परंतु दोन वर्षात यावर काहीच हालचाली न झाल्यामुळे या जमिनीविक्रीचा धडाका सुरु आहे. या गंभीर प्रकाराकडे नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते.
दरम्यान, या जमिनी आरक्षणाची भिती दाखवून मातीमोल दराने खरेदी करायच्या आणि यानंतर पुढे व्यवहार करुन माया जमवायची, यासाठी हातकणंगलेत दलालांची एक टोळी सक्रीय झाली आहे. जिल्ह्यातील काही बडे उद्योगपती या दलालांच्या मध्यस्तीतून सर्व सुत्रे हालवत असल्याची चर्चा आहे. यातील काही जमिनी कुळांच्या ताब्यात आहेत. परंतु त्यांच्या परस्पर या जमिनींची खरेदी विक्री होत आहे. हातकणंगले पेठा भागातील सुमारे 10 एकर जमिनीचा अशाच पद्धतीने व्यवहार झाल्याची तक्रार तहसीलदारांकडे झाल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात तक्रारीची दखल न घेता खरेदी व्यवहार व सात बारा पत्रकी नावे दाखल झाल्याचे समजून येते.

आरक्षणाच्या मुळ हेतूलाच हरताळ
नगरपंचायतीमुळे शहरातील नागरीकांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून जमिनी आरक्षित केल्या जातात. यासाठीच हातकणंगले परिसरातील 35 ते 40 ठिकाणी जमिनींवर आरक्षण टाकलेले आहे. दवाखाना, खेळाचे मैदान, मलनि:सारण प्रकल्प, पाण्याच्या टाक्या, घणकचरा व्यवस्थापन, शाळा, बगीचा यासाठी हे आरक्षण टाकण्यात आले आहे. यावर हरकती सुचनाही मागविण्यात आल्या आहेत. एका बाजूला ही प्रक्रिया सुरु असताना शेतकऱ्यांना आरक्षणाची भिती दाखवून खरेदी विक्री होऊ लागल्यामुळे शासनाच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

न्यायालयात जाणार -दादासाहेब गोरे, तक्रारदार
गट क्रमांक 55 व 1156 ही जमिनी आमचे कब्जेत असून आम्ही कुळ आहोत, तरीही या जमिनीचे बेकायदेशीरपणे खरेदी विक्री व्यवहार झालेला आहे. यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे तक्रारही केली होती. परंतु याबाबत कोणतीच सुनावणी अथवा नोटीस न बजावता, फेरफार मंजूर केलेला आहे. या विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार आहे.