Spread the love

उत्तमराव जानकरांकडून जंतर मंतरवर आंदोलनाचा एल्गार

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून महायुतीचा विजय झाल्याचा गंभीर आरोप याआधी केला आहे. दरम्यान याच मुद्द्यावरुन आमदार उत्तमराव जानकर हे 23 जानेवारी रोजी दिल्लीला मुख्य निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा सादर करणार असल्याचे बोललं जात आहे. माळशिरस येथील पोटनिवडणूक तातडीने जाहीर करावी. ही निवडणूक बॅलेट पेपरवर किंवा व्हीव्हीपॅट दिसेल अशा पद्धतीने घेण्याची मागणी त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केली आहे.
अशातच उत्तमराव जानकर यांनी आज (22 जानेवारीला) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचले आहेत. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जानकर दाखल झाले आहेत. उद्यापासून जानकर हे ईव्हीएम विरोधात दिल्लीत आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची होत असलेली भेट महत्वाची असल्याचे बोलले जात आहे.
या विषयी बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, ईव्हीएम विरोधात मारकडवाडीत उठाव झाला.
⁠तेच वातावरण राज्यभरात आहे. तर येत्या काळात ⁠दिल्लीची निवडणूक आहे, त्यानंतर गोव्याची निवडणूक आहे. ⁠त्यामुळे आम्ही चोर कुठे पकडायचा हा मुद्दा आहे. ⁠कुठेतरी चोरी पकडलीच जाईल. संजय राऊत यांना जेलमध्ये टाकलं तरी त्यांनी संघर्ष केला. ⁠म्हणून त्यांना भेटायला आलो. ⁠आम्ही इतर पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहोत. तसेच जंतर मंतरवर अधिवेशनापूर्वी आंदोलन करता येईल का, हे पाहतोय. 25 तारखेला निवडणूक आयोगाचा स्थापन दिवस आहे. ⁠पुढचं धोरण सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन ठरवू, असेही उत्तम जानकर म्हणाले
⁠ईव्हीएमच्या जिवावर निवडणूक जिंकणे हा राष्ट्रद्रोह
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना ⁠उद्या मी भेटणार आहे, ⁠आम्ही भेट घेऊन नंतर सगळे पत्रकार परिषद घेऊ. ⁠कुणी नाही आलं तरी मी एकटा जंतर मंतरवर बसणार आहे. धानोरे गावातील लोकांना प्रश्न होता म्हणून त्यांनी ग्रामसभा घेऊन हात उंचावून मतदान घेतलं. ईव्हीएम विरोधात आम्ही अनेकदिवस आंदोलन करत आहोत. ⁠ईव्हीएमच्या जिवावर निवडणूक जिंकणे हा राष्ट्रद्रोह आहे. ⁠उत्तमराव जानकर ज्या भागातून निवडन आले तिथल्या लोकांनी हे दाखवून दिले आहे. ⁠लढाई देशाची आहे ही लढाई फक्त त्यांची नाही, ⁠लढाई अशीच होते. ⁠लढाईची सुरुवात अशीच होते. दरम्यान ⁠महाराष्ट्राचा उद्रेक लोकांसमोर आणू . ⁠जिंकलेले अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत आम्ही कसे जिंकलो आणि आम्ही कसे हरलो असे ⁠दोन्ही बाजूंना धक्के बसले असल्याचे ही उत्तम जानकर म्हणाले.