मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
दहावी आणि बारावीच्या परीक्षा महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, आपल्या मुलाला परिक्षेला जात असताना पालक परीक्षा केंद्रांवर गर्दी करत असतात. शिवाय शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची देखील लगबग पाहायला मिळते. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय घेतलाय. दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा निर्णय शिक्षण बोर्डाकडून घेण्यात आलाय. ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत.
कॉपीमुक्त अभियानासाठी जनजागृती सप्ताहाचे आयोजन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा दि. 11/02/2025 ते दि. 18/03/2025 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा दि. 21/02/2025 ते दि. 17/03/2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर दोन्ही परीक्षांना राज्यातून सुमारे 31 लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून सदर परीक्षेत विविध मार्गांनी निष्पन्न होणाऱ्या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो त्यादृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवित असतात
