बीड/ महान कार्य वृत्तसेवा
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात रोज नवे खुलासे पुढे येत आहे. अशातच या प्रकरणातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आल्याने आवादा कंपनीकडे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वाल्मिक कराड याची धनंजय मुंडेंशी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप वारंवार केला जातोय. या प्रकरणाचा मूळ सूत्रधारच मंत्री धनंजय मुंडे आहेत, असा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे.
दरम्यान या एकंदरीत प्रकरणावर आज (22 जानेवारी)मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, ‘मी याबाबतीत काहीही उत्तर देणार नाही. कृपा करून मला याबाबत प्रश्न विचारू नका’, मी या आधीच स्पष्ट सांगितले आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्घृणपणे हत्या केली त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्यामुळे मला वाटत नाही कुणी काय म्हणावं, हा विषय वेगळा असल्याची प्रतिक्रिया देत मंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयी अधिक बोलणे टाळले आहे.
आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचा म्हणजेच 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांसह सत्तेतील नेत्याकडून ही कोंडीत पकडले जात असल्याचे पुढे आले आहे. अशातच गहिनीनाथ गड येथे आयोजित सभेतील भाविकांना मार्गदर्शन न करता आज धनंजय मुंडे केवळ शासकीय महापूजा करून पुढे मार्गस्थ झाले आहेत.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे धनंजय मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा
बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ यांचा 49वा पुण्यतिथी सोहळा साजरा होतोय. यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. प्रत्येक वर्षी मुंडे बहीण भाऊ या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावतात. यंदा मात्र पंकजा मुंडेंची या कार्यक्रमास उपस्थिती नसल्याचे पुढे आले आहे. मात्र यावेळी या संपूर्ण प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देशमुख हत्या प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, अशी प्रतिक्रिया देत मंत्री मुंडे यांनी अधिक बोलणे टाळले आहे.