Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मोबाईल वापरकर्त्यांचा कनेक्टिव्हिटी अनुभव सुधारण्यासाठी दूरसंचार विभागाने एक नवीन फिचर सुरू केले आहे. ज्यामुळे जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल वापरकर्तांना नेटवर्कशिवाय कॉल करणे शक्य होणार आहे. देशातील सर्व टेलिकॉम टॉवर्समध्ये सुरू करण्यात आलेल्या इंट्रा सर्कल रोमिंग सेवेच्या मदतीने हे शक्य होईल. तसेच ही सेवा सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
वापरकर्ते फक्त त्यांच्या विशिष्ट टेलिकॉम ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या टॉवर्सच्या मदतीने ही सेवा मिळवू शकत होते, पण आता आयसीआर सुविधेसह, जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहक अखंड कनेक्टिव्हिटीसाठी डीबीएन-निधीत टॉवर्स वापरू शकतात.
खर्चात होणार बचत
दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार, ही योजना भारतातील 35,400 हून अधिक गावांमध्ये 27,000 डीबीएन-निधीत टॉवर्सद्वारे 4उ कव्हरेज देईल. तसेच ही सेवा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरू केली आहे. यासोबतच, संचार साथी मोबाईल ॲप आणि राष्ट्रीय बॉडबँड मिशन 2.0 देखील लाँच करण्यात आले आहे. या सुविधेमुळे, दूरसंचार कंपन्यांना प्रत्येक भागात त्यांचे टॉवर बसवण्याची आवश्यकता राहणार नाही. या उपक्रमामुळे टीएसपींना ऑपरेशनल खर्चात बचत होणार असून त्यांच्या ग्राहकांना सिग्नलच्या कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
ग्रामीण कनेक्टिव्हीटी सुधारणा
सुविधेबाबत बोलताना सिंधिया यांनी वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देण्यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, बीएसएनएल, एअरटेल आणि जिओ या तीन प्रमुख दूरसंचार कंपन्यांमधील हे सहकार्य डीबीएन-निधी असलेल्या साइट्‌‍सचा फायदा घेत आहे. दूरसंचार कायदा 2023 अंतर्गत स्थापन झालेला डीबीएन हा भारत सरकारने कमी सेवा असलेल्या क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तयार केलेला निधी आहे.