मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महाविकास आघाडीच्या आज होणाऱ्या बैठकीत विरोधी पक्षनेता निवड आणि विधिमंडळाच्या विविध समित्यांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिलीय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल अद्याप अनिश्चितता असल्याने काँग्रेसकडून याबाबत चर्चा करण्यात येणार नसल्याचे ते म्हणालेत. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाची 22 जानेवारीला असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील की नाहीत, याची शंका आहे, असंही त्यांनी सांगितलंय. महापालिका निवडणूक कधी होणार याची अनिश्चितता आहे. त्यामुळे काँग्रेसला आताच याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
भाजपाचा खरा चेहरा आता कळेल : भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आता कळेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावलाय. सरकारला त्यांचेच आमदार सांभाळता येत नसल्याने विरोधी पक्षाच्या आमदारांबद्दल संभम पसरवला जात असल्याचं पटोले म्हणालेत. काँग्रेसतर्फे 25 जानेवारीला मतदार दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. निवडणूक आयोगाने आणि भाजपाने मिळून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केलंय, असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाला शुभेच्छा देणार असल्याचे उपरोधिकपणे नाना पटोले म्हणालेत. मतदार दिनानिमित्त तालुका आणि जिल्हा स्तरावर याबाबत निवेदन सादर करण्यात येईल, अशी माहितीही नाना पटोलेंनी दिलीय.
राज्य सरकार चमत्कारी सरकार : महाराष्ट्रातील राज्य सरकार चमत्कारी सरकार आहे. सहपालकमंत्री नेमणे हा चमत्कार त्यांनी करून दाखवलाय. केवळ पालकमंत्री नेमण्याऐवजी त्याच्यासोबत सहपालकमंत्री नेमून एकटे खाऊ नका, मिळून खा असा संदेश त्यांनी दिला असावा, अशी खिल्लीही पटोलेंनी उडवलीय. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याची मुख्यमंर्त्यांवर नामुष्की आलीय. राज्य सरकार तिजोरीला लुटायचे काम करीत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. मलईदार विभागासाठी, जिल्ह्यासाठी मंर्त्यांमध्ये भांडणे चालली आहेत, त्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही, असेही नाना पटोलेंनी अधोरेखित केलेय.
बांगलादेशी नागरिक कसे प्रवेश करतात? : अक्षय शिंदे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य सरकारचा असली चेहरा समोर आलाय. पोलिसांनी खोटी चकमक केली, पोलिसांना चकमकीचा आदेश देणाऱ्यांवर कारवाई करावी, सरकार आणि पोलीस महासंचालक कार्यालयातील जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केलीय. याबाबत न्यायालयाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. गेल्या 11 वर्षांपासून केंद्रात मोदी सरकार असताना बांगलादेशी नागरिक कसे प्रवेश करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. खरे तर असे प्रकार घडणे म्हणजे, पोलिसांची भीती कमी झाली का अशी परिस्थिती निर्माण झाल्यासारखे आहे, असेही त्यांनी सांगितलेय.
सैफ हल्ल्याप्रकरणी पोलिसांपेक्षा सरकार जबाबदार : पोलीस भरतीत, बदली प्रक्रियेमध्ये भष्टाचार होत असल्याने चांगले पोलीस अधिकारी साईड पोस्टिंगला गेलेत. त्याचा फटका मुंबई आणि राज्याला बसत असल्याचे ते म्हणाले. सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांपेक्षा सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केलाय. सैफ अली खान हल्ला, बीड, परभणी प्रकरणांमुळे राज्याला फटका बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. महाराष्ट्र उद्योगात 19 व्या क्रमांकावर असताना सरकारकडून मात्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा केला जातोय. दावोस दौऱ्यानंतर मुख्यमंत्री राज्यात हजारो, लाखो कोटींची गुंतवणूक आल्याचा दावा करतील, मात्र प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली हे समोर येत नाही, असा टोलाही नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावलाय.