सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, न्यायालयाचा आदेश
सोलापूर/ महान कार्य वृत्तसेवा
एकीकडे वाल्मिक कराडभोवतीचा फास आवळला जात असताना दुसरीकडे त्याच्या मुलाला मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. सुशील कराडवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगत बीड न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागावी असा आदेश सोलापूर न्यायालयाने दिला आहे. वाल्मिक कराडच्या मॅनेंजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करणे, त्याच्या अल्पवयीन मुलीहा मारहाण करणे तसेच बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार आणि सोने नेल्याचा आरोप करण्यात आला होता.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्या विरोधात पीडित महिलेने सोलापुरात फिर्याद दाखल केली होती. दाखल केलेल्या खासगी फिर्यादनुसार संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातला असल्याने पीडित महिलेने बीड जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचे सोलापूर न्यायालयाने आदेश दिले.
पीडित महिलेच्या मागणीनुसार सुशील कराड विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही. संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातील असल्याने सोलापूरच्या हद्दीत गुन्हा दाखल करता येणार नाही असे कोर्टाचे आदेश आहेत.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने मॅनेजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करत त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार तसेच सोने आणि प्लॉट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी पीडित महिलेने सोलापूर न्यायालयाकडे केली होती.
मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील सोलापूर पोलीस आयुक्त आणि बीड पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती.
वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ
वाल्मिक कराडसह सर्वच आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत. या कराड गँगचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. ज्या दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्या दिवशीचाच म्हणजेच 29 नोव्हेंबरचा, केजमधील विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये कराडसह संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्याचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात निलंबित झालेला पीएसआय राजेश पाटीलदेखील वाल्मिक कराडला भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी या निलंबित पीआयलादेखील सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.