नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
26 जानेवारी रोजी भारत आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे, त्यासाठी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी भारत सज्ज झाला आहे. यंदाची परेड विशेष ठरणार आहे कारण डीआरडीओचे प्रलय क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्यपथावर प्रदर्शित होणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच ‘प्रलय’ मिसाईलचा समावेश करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ अर्थात संशोधन, संरक्षण आणि विकास संस्थेने तयार केले असून हे शत्रूच्या मनात धडकी भरवणारे आहे.जमिनीवरून जमिनीवर मारा करणारया या क्षेपणास्त्राची झलक यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित संचलनात दिसणार आहे, अशी माहिती संरक्षण सचिव राकेश कुमार सिंह यांनी दिली. यंदाच्या संचलनात स्वदेशीवर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची सुरुवात हिंदुस्थानी वाद्यांच्या वादनाने होईल. यात तब्बल 300 कलाकार सहभागी होणार असल्याचे राकेश कुमार सिंह यांनी सांगितले.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले, हे क्षेपणास्त्र शेजारील चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर देशाच्या संरक्षण आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. हे 500-1,000 किलोग्राम पेलोड क्षमता असलेले 350-500किमी कमी पल्ल्याचे, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. घन इंधन, युद्धभूमीवरील क्षेपणास्त्र पृथ्वी संरक्षण वाहनावर आधारित आहे. हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आणि नियंत्रण रेषेवर (एलओसी) तैनात करण्यासाठी विकसित केले गेले आहे.