मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
अभिनेता सैफ अली खानला आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी याबद्दल माहिती दिली. अभिनेत्यावर 16 जानेवारीला हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर नुकतेच रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी घुसून चाकूनं हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानं डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मात्र, डॉक्टरांनी आणखी काही दिवस विश्रांती करण्याचा अभिनेत्याला सल्ला दिला आहे. त्यामुळे अभिनेत्याला काही दिवस चित्रपटाच्या शूटिंगपासून दूर राहावं लागणार आहे.
अभिनेता सैफवरील हल्ल्यात आजपर्यंत काय घडलं?
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचा मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी सैफच्या घरातील नोकरांची चौकशी करून त्यांना सोडून दिलं आहे.
यापूर्वी फॉरेन्सिक विभागाच्या टीमनं अभिनेत्याच्या घरातून चाकुचा पडलेला तुकडा आणि इतर पुरावे गोळा केले होते.
दुसरीकडं मंगळवारी सकाळी पोलीस बांगलादेशी आरोपीसह अभिनेत्याच्या घरी पोहोचले. त्यांनी संपूर्ण घटना समजून घेण्यासाठी गुन्ह्यांच रिक्रिएशन केलं. आरोपीला अभिनेत्याच्या संपूर्ण घराच्या लेआउटची माहिती असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादलाला न्यायालयानं पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपी हा बांगलादेशमधील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असल्याची माहिती समोर येत आहे.