Spread the love

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील न्यायालयानं नवाब मलिक यांच्या विरोधातील तक्रारीवर पोलीस चौकशी करण्याचे तसंच अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय महसूल खात्यातील अधिकारी आणि एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या बहिणीने नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आशिष आवारी यांच्या न्यायालयानं या तक्रारीची दखल घेतली आहे. समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार केली. त्यावर ही कारवाही झाली आहे. नवाब मलिक यांनी आपल्या विरोधात अनेक मुलाखतींमध्ये, ट्वीट करून खोटे, निंदनीय तसंच बदनामीकारक आरोप केल्याची तक्रार यास्मिन वानखेडे यांनी केली आहे.
वानखेडे कुटुंबीयांवर दबाव टाकण्यासाठी नवाब मलिक यांनी विविध आरोप केले, अशी तक्रार यास्मिन वानखेडे यांनी दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आशिष आभारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अन्वये पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी महिन्याभरात तपास करून चौकशी अहवाल 15 फेब्रुवारी रोजी सादर करावा, असे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच राज्याचे माजी मंत्री असलेले नवाब मलिक सध्या जामीनावर बाहेर आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. परंतु, त्यांचा समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी पराभव केला. तर, नवाब मलिक यांची कन्या सना मलिक अणुशक्तीनगर मतदारसंघातून विजयी होऊन आमदार झाल्या आहेत. न्यायालयासमोर सादर होणाऱ्या चौकशी अहवालामध्ये पुढे काय होते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.