Spread the love

ठाकरे गटाचे 15 तर काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात; शिवसेनेच्या राहुल शेवाळेंचा दावा

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना स्थानिक स्वराज्य निवडणुकींसह महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 23 जानेवारीला शिवसेना मेळाव्यात मोठा राजकिय भूंकप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. यावेळी ठाकरे गटाचे 15 आमदार तर काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात आहेत. शिवाय ठाकरे गटाचे काही खासदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे जयंती दिनापासून शिवसेना विजयी शिवउत्सव
येत्या 23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती दिनापासून शिवसेना विजयी शिवउत्सव साजरा करणार आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व विजयी आमदारांचा यावेळी सत्कार होणार असून हा सत्कार सोहळा बीकेसी मैदानात होणाऱ्या विजयी मेळाव्यात होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडुण आले. त्यामुळे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा मोठा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही राहुल शेवाळे यांनी यावेळी दिली आहे.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसेल- राहुल शेवाळे
मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग या मेळाव्यातून फुंकले जाईल. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसेल. महाविकास आघाडी स्व:ताचा स्वार्थ जपण्सासाठी बनली होती. त्यामुळेच आता महाविकास आघाडीत बिघाडी सुरू झालीय. शिवसेनेच्या मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदांना सध्या स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान 23 जानेवारी पासून शिवसेनेची नव सदस्य नौंदणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य नेते एकनाथ शिंदे नव्या नियुक्त्या जाहीर करतील असेही ते यावेळी म्हणाले. स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी देखील संपुर्ण महाराष्ट्रभर संपर्क अभियान सुरू करण्यात येणार आहे. यावेळी लाडक्या बहिणींचेही आभार व्यक्तं करण्यात येणार आहे. पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री लवकरच सकारात्मक निर्णय घेतील. हा महायुतीचा अंतर्गत प्रश्ने आहे. यात महाविकास आघाडीच्या लोकांनी बोलू नये असा इशाराही राहुल शेवाळे यांनी यावेळी दिली आहे.