Spread the love

सातारा/महान कार्य वृत्तसेवा
शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अडीच वर्षापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता. तशाच भूकंपाचे संकेत सध्या मिळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप आणि नवा ‘उदय’ होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे गावी कधी येतात? : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचा दावा शिवसेनेने (एकनाथ शिंदे) केला होता. तसंच किमान पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळेल, असं एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांना वाटत होते. मात्र, भाजपाने त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला भाग पाडले. त्यावरून ते नाराज होते. त्यानंतर पालकमंर्त्यांच्या नियुक्तीवरून त्या नाराजीत भर पडली आहे. निराश अथवा मोठ्या यशाची आकांक्षा असते, त्यावेळी एकनाथ शिंदे हे दरे गावी येतात, असे म्हटले जाते.
वडेट्टीवार, राऊतांच्या वक्तव्याने खळबळ : भाजपाने शिवसेना फोडून उध्दव ठाकरेंना संपवले. आता एकनाथ शिंदेंना संपवून नवा ‘उदय’ होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंर्त्यांसोबत दावोस दौऱ्यावर गेलेल्या उदय सामंतांचा मुख्यमंत्री निवडीवेळीच ‘उदय’ होणार होता, असं थेट वक्तव्य केलय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ्याच घडामोडींचे संकेत मिळायला सुरूवात झाली आहे.
बावनकुळे, महाजन येणार दरे गावी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून ते महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावी आले आहेत. त्यामुळं त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे खास हेलिकॉप्टरने दरे गावी येऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. भाजपा नेत्यांच्या या मनधरणीला यश येणार का? आणि राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
साताऱ्यातील भाजपातही नाराजी : पालकमंत्रिपदावरून अनेक जिल्ह्यांमधील महायुतीतल्या पक्षांमध्ये नाराजी आहे. सातारा जिल्ह्यातील आठपैकी चार जागा जिंकूनही भाजपाला साताऱ्याचं पालकमंत्रिपद मिळालं नाही. यावरून भाजपात छुपी नाराजी आहे. शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंना पुन्हा पालकमंत्रिपद मिळाल्यानं सातारा, वाई, खंडाळ्यात भाजपा आणि राष्ट्रवादीत (अजित पवार) नाराजी पाहायला मिळत आहे.
दरेवाल्या बाबांनी कुंभमेळ्याला जावे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राग आला की गावाला जातात. ते अस्वस्थ आत्मा आहेत. दरेवाल्या बाबांनी कुंभमेळ्यात जाऊन नागा साधुबरोबर बसावे. गंगेत डुबकी मारावी. महाराष्ट्राला त्रास देऊ नये, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार असल्याचे सांगत लवकरच राजकारणात नवा उदय होणार असल्याचं थेट वक्तव्य त्यांनी त्यांनी केलेय.