कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार असल्याने भाविकांना श्री ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही.मिळालेल्या माहितीनुसार पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून उद्या (दि. 21) पासून रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम 24 जानेवारीपर्यंत चालू राहणार असल्याने या कालावधीत मूर्तीचे दर्शन भाविकांना मिळणार नाही.
मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांच्यावतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीने 3 जानेवारी रोजी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना मूर्तीच्या संवर्धनासाठी पत्र लिहिले होते. भारतीय पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करायचे ठरवले असल्याने मंगळवार ( दि. 21) ते शुक्रवार दि .24 ) पर्यंत भाविकांना ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही. दरम्यान भाविकांना फक्त उत्सव मूर्ती आणि कळसाचे दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.