पुराव्यांस सामाजिक कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
पंचगंगा नदीतील वाळू चोरी प्रकरणी वापरण्यात आलेली जेसीबी, आयवा, पोकलेन, डंपर, इत्यादी वाहने जप्त करण्यात यावीत. तसेच या वाहनांमधून वाळूची चोरी झाले प्रकरणी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर ही फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी तक्रार इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबधीत शासकीय यंत्रणेकडे केली आहे. त्यामुळे याप्रकरणी शासकीय यंत्रणा कोणती कारवाई करते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहीले आहे.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीमधून गाळ उपशाच्या नावाखाली वाळू उपसा करून वाळूची चोरी होत असल्याबाबत दैनिक महान कार्य ने वृतमालिका सुरू केली होती. याची दखल घेत प्रशासनाने पंचगंगा नदीतील वाळू उपसा बंद केला होता. परंतु शासकीय यंत्रणेने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी इचलकरंजी शहर व कबनूर मधील सामाजिक कार्यकर्ते सुनील कांदेकर, प्रसाद दामले, महेश कलगुटकी, संदीप मोरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, महसूल विभागाचे आयुक्त,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, कोल्हापूर कक्षाचे मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार 48 प्रमाणे नदीपात्रातील गौण खनिज चोरून नेले प्रकरणी संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा याप्रकरणी वापरण्यात आलेल्या जेसीबी, हायवा, पोकलेन, डंपर, चोरून नेलेली वाळू जप्त करावी.
तसेच संबंधित प्रकारात जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सदर निवेदना सोबत वाळू चोरी प्रकरणी वापरण्यात आलेल्या वाहनांची छायाचित्रे, तसेच वाळू ज्या ठिकाणी ठेवली आहे. त्या ठिकाणची छायाचित्रे ही या सोबत जोडण्यात आली आहेत. त्यामुळे आता तरी वाळू चोरावर प्रशासकीय अधिकारी कारवाई करणार का याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.