Spread the love

संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
कोरोची येथील ‌‘बाप-लेकाच्या’ खासगी सावकारीच्या त्रासाला वैतागून रविवारी दुपारी एका युवकाने ‌‘चिंद्यापीर’जवळ आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही युवकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला.
कोरोची ता.हातकणंगले येथील खासगी सावकाराने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. रविवारी दुपारी याची दाहकता समोर आली. येथील एका तरुणाने आईच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी सावकारी करीत असलेल्या ‌‘बाप-लेकां’कडून 3 लाख 30 हजार रुपये 2023 मध्ये घेतले होते. वेळोवेळी त्याने 10 टक्के प्रमाणे व्याजाची परतफेड केली. आतापर्यंत त्याने दोन वर्षात 4 लाख 80 हजार रुपये त्यांच्याकडे ऑनलाईन व त्यांच्या घरी जाऊन रोखीने दिलेले आहेत. तरीही व्याज आणि मुद्दलसाठी त्या बापलेकाने त्याच्याकडे वारंवार पैशाचा तगादा लावल्यामुळे तो नैराश्येत होता. आईच्या उपचारासाठी घेतलेल्या रक्कमेपेक्षा दिड लाख रुपये जादा दिले. तरीही त्या बापलेकांनी त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी केल्यामुळे तो हवालदिल झाला होता. त्यातच एका लिलाव भिशी धारकाने त्याला 30 हजार रुपयांसाठी तगादा लावला होता. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन पुर्णत: बिघडले होते. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या त्रासातून कायमचे मुक्त होण्यासाठी त्याने आत्महत्त्येचा निर्णय घेतला आणि मोटरसायकलवरुन घोडावत विद्यापीठाजवळील असलेल्या चिंद्या पीर डोंगरात जीवन संपविण्याच्या उद्देशाने तो आला होता. याची माहिती त्याच्या सहकारी मित्रांना मिळाली. त्यांनी तात्काळ त्याचा पाठलाग करुन त्याला आत्महत्त्येपासून परावृत्त केले. आणि त्याचा जीव वाचविला. या संदर्भात महान कार्यच्या प्रस्तुत प्रतिनिधीजवळ त्यांच्या मित्रांनी ही घडलेली घटना कथन केली आणि न्याय देण्याची मागणी केली.
दरम्यान, कोरोची येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला या घटनेची माहिती देण्यात आली. आणि संबंधीत खासगी सावकार बाप लेकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. आता पहावे लागेल तो सामाजिक कार्यकर्ता कोणती भुमिका घेतो.