पुलाची शिरोली/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
शिये येथील विहिरीतून चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गेल्या आठ दिवसापासून तपासाची चक्रे गतिमान करत विविध पथके तयार करून चोरट्यांचा शोध सुरू केला होता. ही नेमलेली पथके मोटार सायकल चोरांचा शोध घेत असताना या पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना खबर्यामार्फत माहिती मिळाली की शिये,ता.करवीर येथील वैभव माने हा व्यक्ती मोटारसायकली चोरून त्याचे सुट्टे पार्ट विकत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर या यांच्या मार्गदर्शनाखाली शिये येथील वैभव माने याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली असता चार मोटारसायकलची आठ मॅगव्हीलची चाके मिळाली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता शिये येथील खणीच्या बाजूला असणार्या विहिरीमध्ये मोटरसायकली टाकल्याची कबुली दिली. त्याठिकाणी जीवरक्षक दिनकर कांबळे यांना बोलविण्यात आले. जीवरक्षक दिनकर कांबळे व स्थानिक रहिवाशी यांची मदत घेऊन त्या विहिरीतून चार मोटारसायकली बाहेर काढण्यात आल्या. या मोटारसायकली वैभव माने व त्याचा मित्र दिपक सिसाळ यांनी कोल्हापूर शहरातील सेवा रुग्णालय, कसबा बावडा, शिवाजी पार्क, डी मार्ट ताराबाई पार्क, सनराईज हॉस्पिटल, सी पी आर येथून गेल्या सात आठ महिन्यात चोरल्याची कबुली दिली. या मोटरसायकली चोरल्याचे कळू नये म्हणून शिये तसेच पंचगंगा नदीपात्रात व नागाव येथील विहिरीत टाकल्याची कबुली दिली आहे. त्यादिशेने पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी वैभव यशवंत माने (वय 28) रा.कुरळप,ता. वाळवा, जि. सांगली सध्या रा.शिये,ता.करवीर व दिपक दादासो सिसाळ(वय 31) विठ्ठलनगर, शिये या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसूटगे,शेष मोरे,पोलीस अंमलदार विलास किरोळकर,रामचंद्र कोळी,सुरेश पाटील,सागर चौगुले ,अमित सर्जे ,विनोद कांबळे,रुपेश माने,सागर माने,चालक राजेंद्र वरंडेकर,सुशिल पाटील यांनी केली आहे.