Spread the love

इचलकरंजी/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
शहापूर परिसरातील महात्मा फुले सोसायटीतील घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी आकाश राजेंद्र देशिंगे (वय 21 रा. धनगर गल्ली शहापूर) व अतिक नजीर कुरेशी (वय 21 रा. गाव चावडीजवळ) अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून 75 हजाराचे 10 ग्रॅम वजनाचे दागिने व मोबाईल असा 80 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील आकाश देशिंगे याच्यावर यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहापूर परिसरातील महात्मा फुले सोसायटीतील एका घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी 4 नोव्हेंबर 2024 रोजी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरातील शोकेसमधील सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला होता. या घरफोडीचा तपास सुरु असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल असिफ कलायगार यांना प्राप्त माहितीवरून आकाश देशिंगे व अतिक कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दागिने व मोबाईल असा 80 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे, असिफ कलायगार, रोहित डावाळे, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे व साजिद कुरणे यांच्या पथकाने केली.