इचलकरंजी/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
जुन्या वादातून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून विशाल आप्पासो लोकरे (वय 29, रा. संतमळा) याचा खून केल्या प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि गावभाग पोलिसांनी सागर मोहन वाघमारे , यश अरुण चौगुले व संतोष मनोळे (सर्व रा.इचलकरंजी) या तिघांच्या मुसक्या आवळल्या. रविवारी येथील न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले. 22 जानेवारी पर्यत या सर्वांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
शुक्रवारी रात्री उशिरा विशाल याच्या खुनानंतर संशयित आरोपी फरार झाले होते. घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व गावभाग पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयित आरोपी परराज्यात जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संशयितांचा शोध घेऊन सागर वाघमारे, संतोष मनोळे या दोघांना सावंतवाडी रेल्वेस्टेशनवरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरून घटना घडल्याचे कबूल केले. संशयितांपैकी यश अरुण चौगुले हा इचलकरंजी परिसरात असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार गावभाग पोलिसांनी चौगुले याचा शोध सुरू केला होता. पंचगंगा साखर कारखान्याजवळील शहापूर रोडवर चौगुले याच्या मुसक्या आवळल्या.या तिघांनाही रविवारी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयासमोर हजर करण्यात आले.