पुणे/महान कार्य वृत्तसेवा
सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका वाल्मिक कराडवर ठेवण्यात आला आहे. अशातच आता पोलिसांनी वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलीये. वाल्मिक कराडच्या गडगंज संपत्ती बाबत अनेक खुलासे होताना दिसत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या 2 पत्नींच्या नावे अंदाजे 22 ते 25 कोटींची ऑन रेकॉर्ड मालमत्ता आहे. अशातच आता अमनोरा पार्कमधेही दोन आलिशान फ्लँट्स सापडले आहेत. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती कदम याच अमनोरा पार्क परिसरात राहत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दोन्ही पत्नींच्या नावे कुठे आणि किती संपत्ती?
पहिली पत्नी मंजिरी आणि वाल्मिकच्या स्वत:च्या नावे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत 4 बीएचके फ्लॅट असल्याची माहिती समोर आलीये. याची अंदाजे किंमत सव्वा तीन कोटी रुपये आहे.
वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिरी आणि वाल्मिकच्या स्वत:च्या नावे पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये 2 बीएचके फ्लॅट असून त्याची अंदाजे किंमत एक कोटी रुपये आहे.
तसेच वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत दोन ऑफीस स्पेसेस आहेत. अंदाजे बारा कोटी रुपये इतकी याची किंमत आहे.
एवढंच नाही तर वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसरमधील एमनोरा टाऊनशीपमधे दोन फ्लऍटस आहेत, ज्याची अंदाजे किंमत तीन कोटी रुपये असल्याची माहिती समोर येतीये.
पिंपरी चिंचवड महापालिकेची नोटीस
वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवने फ्लॅटचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मिळकत कर न भरल्यामुळे कर संकलन विभागाने त्याच्या या फ्लॅट वर नोटीस बजावली होती. वाल्मिक कराडकडे 1 लाख 55 हजारांचा मालमत्ता कर थकीत असून पिंपरी चिंचवड महापालिकेने नोटीस बजावली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडची गडगंज संपत्ती आहे तरी किती? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
धनंजय मुंढे यांचा हात – संदीप शिरसागर
दरम्यान, ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांची संपत्ती समोर येत आहे. हे एकट्या वाल्मिक कराड चे काम नाही धनंजय मुंढे यांचा हात आहे. संपत्तीचा आकडा बघता आता ईडीने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी बीडचे आमदार संदीप शिरसागर यांनी बीड मध्ये केली.