Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहिण योजना आता नियम आणि अटींच्या कचाट्यात सापडली आहे. सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून पैसे मागे घेण्याचा सपाटा लावला आहे. थेट इन्कम टॅक्स आणि परिवहन विभागाकडून प्रत्येक लाडक्या बहिण योजनेत अर्ज भरणाऱ्या महिलेची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहितीच खुद्द बाल कल्याण आणि महिला विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आणि सरकट लाडक्या बहिणींना पैसेही वाटप केले. पण आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे. याबद्दल बाल कल्याण आणि महिला विकास मंत्री अदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे.
”लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे. आम्ही पडताळणी सुरू केली आहे. ज्यांमध्ये असे आढळून आले आहे की, काही महिला या लाभार्थी असून त्यांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरले आहे. काही जणांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. काही जणी आधीच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे आणि आता लाडक्या बहिणींचा सुद्धा हफ्ता घेत आहे. घरात दुचाकी किंवा चारचाकी आहे. अशा लाडक्या बहिणींनी स्वत:हुन मिळालेला लाभ परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.
‘मागील महिन्यात काही महिलांनी पैसे परत केले आहे. डिसेंबरमध्ये काही पैसे जमा झाले आहे. ते सरकारी चलान म्हणून स्वीकारले जात आहे. ते पैसे सरकारच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या जानेवारी महिन्यात सुद्धा काही महिलांनी लाडक्या बहिणीचे पैसे परत केले आहे’ असेही तटकरेंनी सांगितले.
इन्कम टॅक्स विभागाकडूनही होणार पडताळणी
‘3500 किंवा 4 हजार असतील, त्याची प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबर महिन्यात काही लाडक्या बहिणींनी पैसे परत केली. आता जानेवारी महिन्यात हजारो महिलांनी पैसे परत केले आहे. जसे जसे त्या ठिकाणी लक्षात येईल, तशी प्रक्रिया सुरू आहे. लाडक्या बहिण योजनेची पडताळणी ही परिवहन विभाग, इन्कम टॅक्स विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. ही कायम स्वरुपात सुरू आहे. त्यामुळे काही महिलांनी स्वत: हून पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. ज्या महिला लाडक्या बहिणींसाठी पात्र नसतानाही लाभ घेतला असेल त्याबद्दल संबंधित विभागाकडून पडताळणी सुरू आहे’ असेही तटकरेंनी स्पष्ट केले.
पण, लाडक्या बहिणीसाठी जे निकष ठरवले होते, त्यात आता कोणतेही बदल केले नाही. ते निकष हे कायम असणार आहे. 26 जानेवारीनंतर सातवा हफ्ता खात्यात जमा होणार आहे, असेही तटकरेंनी सांगितले.
महिलाच करतायत पैसे परत
अर्जांची पडताळणी झाली तर अपात्र ठरू, मिळालेल्या लाभाची रक्कम आपल्याकडून दंडासह वसूल केली जाईल या भीतीने माघार घेतली आहे. सरसकट अर्ज पडताळणी झाली तर अडकू या भीतीने अर्ज माघार घेणे सुरू झाले आहे. तूर्तास सरकारकडून ज्यांनी अशा प्रकारे अर्ज भरले आहेत त्या महिला अपात्र आढळल्या तर कोणताही दंड घेतला जात नाही. मात्र आतापर्यंत जेवढे हप्ते मिळाले ती सगळी रक्कम खात्यावर भरावी असे सांगितले जाते.
पडताळणी कशी होणार?
पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारक महिलांनाच मिळणार लाभ
मनो शेतकरी सन्मान योजनेतील महिलांना केवळ 500 रुपयेच मिळणार
संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार
हस्तांतर योजनेशी संलग्न खात्यातून वसूल करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले