जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
प्रस्तावित रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी चोकाक या गावच्या पुढे हातकणंगले तालुक्यातील काही गावे व शिरोळ तालुक्यातील तमदलगे, निमशिरगांव, जैनापुर, उमळवाड,उदगांव या गावांमधील संपादित केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना चौपट मोबदला दिल्याशिवाय या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या रत्नागिरी पासून हातकणंगले तालुक्यातील चोकाक पर्यंतचे काम वेगाने पूर्ण करत आणले आहे, या पुढे चोकाक पासून अंकली पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग बनविताना हातकणंगले तालुक्यातील काही गावांसह तमदलगे पासून अंकली पर्यंतच्या मार्गात मोठ्या प्रमाणात बागायती शेतीचे संपादन करावे लागणार आहे, शासनाने हा राष्ट्रीय महामार्ग बनवताना रत्नागिरी ते चोकाक पर्यंतच्या महामार्गावरील संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींना चौपट मोबदला दिला असून या पुढच्या शेतकऱ्यांना मात्र केवळ दुप्पट मोबदला दिला जाईल, असे धोरण अवलंबले आहे, याला शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील ज्या गावांमधून हा महामार्ग जातो त्या गावांमधील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे शासनाने या ठिकाणच्या जमिनी संपादित करताना संबंधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिल्याखेरीज या रस्त्याचे काम करू देणार नाही, असा परखड इशारा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे.
दळणवळणासाठी मजबूत रस्ते बनवणे ही काळाची गरज आहे, परंतु ते बनवत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्यावर अन्याय करून असा विकास करणे संयुक्तिक नाही, त्यामुळे या परिसरातील या शेतकऱ्यांच्या मागणीला शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी देखील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.