Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई येथील पान टपरीत नशेच्या गोळ्या प्रकरणाची चौकशी होणार, याची कुणकुण लागताच ‌‘त्या’ दोन पोलिसांनी फिल्डींग लावली आणि विकलेलं मंगळसुत्र लाडक्या बहिणीच्या गळ्यात परत आलं. दरम्यान, दुपारी अप्पर पोलीस अधिक्षक नितेश खाटमोडे-पाटील यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. संबंधीत लाडक्या बहिणीस पुर्व सुचना देऊन यापुर्वीच पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी केलेल्या सक्त ‌‘ट्रेनिंग’प्रमाणे संबंधीत महिलेने पाटील यांच्यासमोर जबाब नोंदविला. माझी काहीही तक्रार नाही, मी पोलिसांना पैसे दिलेले नाहीत. माझे मंगळसुत्र माझ्या गळ्यातच आहे, आणि ते तिनं खाटमोडे-पाटील यांना दाखविलेही. मला या पोलिसांनी चांगले सहकार्य केलेले आहे, असा जबाब तिने दिल्याचे कळते. एकुणच हे गंभीर प्रकरणी ‌‘त्या’ पोलिसांनी चांगलेच मॅनेज केल्याचे दिसते.

लाडक्या बहिणीच्या मंगळसुत्र प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे : बनगे


रुई येथील लाडक्या बहिणीचं मंगळसुत्र विक्री करायला लावणाऱ्या त्या दोन पोलिसांची कसून चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे, अशी जोरदार मागणी हातकणंगले तालुका लाडकी बहिण योजना समितीचे अध्यक्ष अविनाश बनगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गृह विभागाला चौकशीचे आदेश देण्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणावरुन बनगे अतिशय आक्रमक झाले आहे. त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशीही या संदर्भात येत्या दोन दिवसात भेट घेऊन प्रकरण तडीस लावण्याची विनंती करणार आहेत.