Spread the love

कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा
शिवाजी विद्यापीठाचा 61 वा दीक्षांचा समारंभ 17 जानेवारीला पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले प्रमुख पाहुणे असणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन असणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात असणाऱ्या राजमाता जिजाऊ सभागृहात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, परीक्षा आणि मूल्यमापन नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. अजित सिंह जाधव आणि कुलसूचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या दीक्षांत समारंभात 51 हजार 492 स्नातकांना पदवी देण्यात येणार आहे. यापैकी 14 हजार 269 स्नातक प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवीचे प्रमाणपत्र घेणार आहेत. 37 हजार 223 स्नातक पोस्टद्वारे पदवी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आल आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या विविध विभागांकडून पदवी संपादन करणाऱ्यांमध्ये यंदा देखील मुलींनी बाजी मारली असून एकूण स्नातकांमध्ये मुलींचे प्रमाण 55 टक्के पेक्षा जास्त आहे. 5 हजार 856 विद्यार्थी आणि 8 हजार 413 विद्यार्थिनींचा समावेश आहे. 37 हजार 223 विद्यार्थ्यांना पोस्टाने दीक्षांत समारंभ दिवशीच पदवी प्रमाणपत्र पाठवण्यात येणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून दीक्षांत कार्यक्रमाच्या राजमाता जिजाऊ सभामंडपापर्यंत आयोजित केलेल्या विशेष मिरवणुकीसाठी मंडप उभारण्यात आलेला आहे. तसेच पदवी प्रमाणपत्र वितरणासाठी 50 स्टॉल्सची उभारणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणत्या बुथवर पदवी प्रमाणपत्र मिळणार याची माहिती आधीच मोबाईलवर मेसेज द्वारे मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे शुक्रवारी 17 जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राज्यपालांचं सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 ते 12.15 शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते विद्यापीठाच्या गेस्ट हाउस वर थांबणार आहेत आणि दुपारनंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.