दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
सोशल मीडिया कंपनी META ने आपले सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, कोरोनानंतर जगातील अनेक देशांमध्ये विद्यमान सरकारे पडली. भारताच्या लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचा पराभव झाला. यावरून जनतेचा सरकारवरील कमी होत चाललेला विश्वास दिसून येतो. या विधानानंतर संसदेच्या आयटी समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या वक्तव्याबद्दल कंपनीने माफी मागावी, असे म्हटले होते. अन्यथा आमची समिती त्यांना मानहानीची नोटीस पाठवेल. मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी बुधवारी सांगितले की, हा निष्काळजीपणा होता. मार्क झुकरबर्ग म्हणाले की, कोरोनानंतर अनेक विद्यमान सरकारे पडली, परंतु भारतात असे झाले नाही. निष्काळजीपणामुळे झालेल्या या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे.
रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतात 2024 च्या निवडणुकीत 64 कोटी लोकांनी भाग घेतला होता. देशातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास ठेवला आहे. झुकेरबर्गचा दावा तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा आहे. त्यांनी तथ्य आणि विश्वासार्हता राखली पाहिजे.
