Spread the love

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
दिल्ली उच्च न्यायालयाने एफमजीसी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या डाबरला नोंदणीकृत ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून नोटीस बजावली आहे. टाटा ग्रुपच्या मालकिच्या कॅपिटल फूड्‌‍सने त्यांची नोंदणीकृत ट्रेडमार्क ‘शेझवान चटणी’ डाबरने ‘चिंग्ज शेझवान चटणी’ म्हणून बाजारात आणली असल्याचा आरोप केला आहे.
कॅपिटल फूड्‌‍सने आपल्या याचिकेत असा दावा केला आहे की, ‘शेझवान चटणी’ हा शब्द कंपनीशी संबंधित एक प्रसिद्ध नाव आहे आणि बँडच्या प्रचारात त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. कॅपिटल फूड्‌‍सने, डाबरने त्यांच्या उत्पादनासाठी सारखेचच नाव आणि पॅकेजिंग वापरून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. पुढे, कॅपिटल फूड्‌‍सने, डाबर ‘शेझवान चटणी’साठी मोठी आणि ठळक अक्षरे तर स्वत:चा बँडच्या नावासाठी लहान आणि कमी दृश्यमान असलेली अक्षरे वापरत असल्याचा आरोप केला आहे.

‘शेझवान चटणी’ ट्रेडमार्कची नोंदणी रद्द करण्याची मागणी

दरम्यान डाबरने हे उत्पादन गेल्या वर्षी आणले होते. त्यानंतर त्यांनी ‘शेझवान चटणी’ ट्रेडमार्कची नोंदणी रद्द करण्याची मागणी ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडे केली होती. त्यावेळी डाबरने असा युक्तिवाद केला की, ‘शेझवान चटणी’ हा शब्द उत्पादनाच्या प्रकार आणि गुणवत्तेचा संदर्भ देतो आणि म्हणून त्याला ट्रेडमार्क संरक्षण देऊ नये. त्यांनी पुढे असा दावा केला की ‘शेझवान चटणी’ ही एक सामान्य संज्ञा आहे आणि ती ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत होऊ शकत नाही.
चिंग्ज सीक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स सारख्या बँड्‌‍सची मालकी असलेले कॅपिटल फूड्‌‍स जानेवारी 2024 मध्ये टाटा कंझ्युमरने विकत घेतले आहे. भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेली डाबर च्यवनप्राश आणि रिअल ज्यूसेससारखी उत्पादने निर्माण करते. कॅपिटल फूड्‌‍सने यापूर्वीही ‘शेझवान चटणी’ ट्रेडमार्कबाबत कॉपीराइट उल्लंघनाचे खटले दाखल केले आहेत.
काय करते डाबर कंपनी?
डाबर ही एक बहुराष्ट्रीय ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी आहे. ही कंपनी आयुर्वेदिक उत्पादने आणि ग्राहकोपयोगी वस्तू बनवते. कंपनीची स्थापना 1884 मध्ये कलकत्ता येथील डॉ. एस. के. बर्मन यांनी केली होती. याचबरोबर डाबर ही जगातील सर्वात मोठी आयुर्वेदिक कंपनी आहे. डाबर कंपनीद्वारे आयुर्वेदिक औषधे, केस, त्वचा आणि अन्न व पेये यांचे उत्पादन करते.