मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महाविकास आघाडी फुटल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. राज्याच्या राजकारणात 2019मध्ये अस्तित्वात आलेली मविआ फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली स्वबळाची घोषणा. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे. महानगरपालिका, झेडपी, नगरपंचात निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा संजय राऊतांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. आमच्या पक्षाच्या भूमिका पक्षश्रेष्टी ठरवतील अशी प्रतिक्रीया काँग्रेसच्या नेत्यांनी दिलीय. तर, राऊत असं का बोलताहेत हे कळत नसल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल आहे. तर ‘मविआ राहील की तुटेल, याकडे आमचं लक्ष नाही’ ‘महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याकडे आमचा प्रयत्न असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर अधिक बोलणे टाळलेय.
मविआने एकत्र लढावे की स्वतंत्र लढावं हा त्यांचा प्रश्न आहे आमचा त्याच्याशी संबंध नाही अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलीय. मविआच्या फुटीची चर्चा सुरू असतानाच मविआच्या स्थापनेचा काळही तितकाच राजकीय घडामोडींचा होता.
संजय राऊतांनी जरी स्वबळाची घोषणा केली असली तरी मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने यावर सावध प्रतिक्रीया दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात त्या राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणार आहेत.
महाविकास आघाडी फुटली?
24 ऑक्टोबर 2019 – शिवसेना-भाजप युतीला विधानसभेत 161 जागा
28 ऑक्टोबर 2019 – शिवसेनेकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी
30 ऑक्टोबर 2019 – भाजपकडून अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्यास नकार
1 नोव्हेंबर 2019 – राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचे संजय राऊतांचे संकेत
8 नोव्हेंबर 2019 – भाजप-शिवसेना युती तुटल्यावर शिक्कामोर्तब
22 नोव्हेंबर 2019 – शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीची घोषणा
10 जून 2022 – मविआचं बहुमत असतानाही भाजपची राज्यसभा निवडणुकीत बाजी
21 जून 2022 – शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांसह नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात
29 जून 2022 – उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5 जून 2024 – लोकसभा निवडणुकीत मविआची बाजी मविआला 31 जागा
23 नोव्हेंबर 2024 – विधानसभा निवडणुकीत मविआचा दारुण पराभव
11 जानेवारी 2025 – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वबळाची घोषणा