Spread the love

शरद पवार गटाचे 8 आणि उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार यांच्यावर भाजपाची नजर

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने सत्ता स्थापन केली. मात्र, भाजपला मित्रपक्षांचा टेकू घ्यावा लागला. सध्याचे सरकार मित्रपक्षांच्या मदतीवर उभं आहेत. एनडीएतील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्या निर्णयावर मोदी सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांचा इतिहास पाहता कोणत्याही क्षणी केंद्र सरकारचा पाठिंबा मागे घेतील अशी चर्चा सुरू आहे. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपकडून मोठा डाव आखला जात आहे. या बेभवरवशाच्या पक्षांवर अवलंबून राहता कामा नये अशी भूमिका भाजपच्या नेतृत्त्वाने घेतली आहे.
‘ऑपरेशन 272’ प्लानिंग का?
चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी दगाफटका करण्याआधीच भाजपकडून लहान घटक पक्षांकडे आपलं लक्ष वळवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून आक्रमक पवित्रा घेतला जात असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू झाली आहे. नितीश कुमार यांची राजकीय भूमिका काहीशी अस्पष्ट झाली आहे. नितीश कुमार हे एनडीए सोडण्याची चर्चा सुरू असते. बेभरवशाच्या मित्रपक्षांच्या आधारे सरकार टिकवण्याऐवजी आपले किंवा विश्वासू मित्रपक्षांचे बळ वाढवण्याकडे भाजपने लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्यानंतरही भाजपकडून ‘ऑपरेशन 272’ राबवले जाण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन 272’ ची चर्चा सुरू आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बळावर केंद्रात भाजपाचं 240 खासदारांच्या पाठिंब्याने अल्पमतात सरकार बनले आहे. चंद्राबाबू नायडू 16 आणि नितीश कुमार यांचे 12 खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणे सोडण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन 272 चं प्लॅनिंग केले जात असल्याचं बोलले जाते. ज्यात शरद पवार गटाचे 8 आणि उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये 272 खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी 260 इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट 272 इतके झाले. सर्व खासदार सोबत येतील किंवा एक तृतीयांश खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.