मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होत असून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई अद्याप का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. वाल्मिक कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच नोटीस दिली होती. मात्र, कुठलीही कारवाई न झाल्याने वाल्मिक कराड बिनधास्त असून वेळेवर ईडीने कारवाई केली असती तर सरपंच हत्याप्रकरण घडलंच नसतं, असे खासदार सुळे यांनी म्हटलं आहे. मागील एक महिना बीड आणि परभणी घटनेबाबत आमचे लोक बोलत आहेत. संसदेत पहिला आवाज या विरोधात बजरंग सोनवणे यांनी उठवला होता. तर, या विरोधात जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर हेही सातत्याने बोलत आहेत, त्यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अद्यापही वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
बीड हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी संसदेत बजरंग सोनवणे यांनी केली. संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात विषय मांडला, जितेंद्र आव्हाड यांनी देखील मांडला. मागील 30 दिवस ते बोलत आहेत. माणुसकीच्या नात्याने आपण सर्वजण एकच म्हणत आहोत की, पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला हवा. मी अनेक वर्षे संसदेत काम करत आहे. पीएएमएले कायदा आला, यामधे खंडणी प्रकरणी कायद्यात तरतुदी आहेत. मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, इडी हे केंद्रासाठी काम करत. वाल्मिक कराड यांच्या नावाने एक कागद आहे, पीएमएलए कायद्याअंतर्गत एक नोटीस यांना आली आहे, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी ती नोटीसच पत्रकार परिषदेत दाखवली. मात्र, अद्यापही त्या अंतर्गत कारवाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले.
वाल्मिक कराडची अटक खंडणी प्रकरणी झाली असून गुन्हा दाखल आहे. मग पीएमएलए कायदा का लागू केला नाही? 11 डिसेंबर एफआयआर आहे, त्यात वाल्मिक कराडच नाव आहे. आवादा कंपनीने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्बात ईडीकडून नोटीस आहे. मग, खंडणीची नोटीस असताना त्यांच्यावर कारवाई का नाही? एकीकडे तुम्ही नुसत्या आरोपांवर गुन्हा दाखल करता आणि इथ केस आहे, तिसरी एफआयआर दाखल केली आहे. मग वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही?, असा सवाल सुळे यांनी विचारला आहे. जर आधीच वाल्मिक कराडवर कारवाई झाली असती, तर संतोष भाऊ यांची हत्याच झाली नसती असेही सुळेंनी म्हटले.
लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करता?
लाडली बहीण योजना परळी तालुका अध्यक्ष वाल्मिक कराड आहे. ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याला तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करता?. अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक याना एक कायदा आणि वाल्मिक कराडला वेगळा कायदा का?, असे अनेक सवाल सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत विचारले आहेत.