मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोग प्रकरणावरुन सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा महासंग्राम काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. परभणीच्या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेटपणे धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबीयांना धनंजय मुंडेंकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही गंभीर आरोप केला.
धनंजय मुंडे देशमुख कुटुंबाला धमक्या देत असतील तर त्यांचे रस्त्यावर फिरणे बंद करू, असा उघड इशारा मनोज जरांगे यांनी परभणीच्या मोर्चातून दिला. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंविरोधात थेटपणे रणशिंग फुंकल्याचे परभणीत पाहायला मिळाले.
मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर 26 दिवसांनंतर मुख्य आरोपी जेरबंद झाले आहे. पण, या प्रकरणात धनंजय मुंडेंचा अत्यंत विश्वासू असलेल्या वाल्मिक कराडला अटक झाली आहे. त्यामुळे याप्रकरणात थेटपणे धनंजय मुंडेंचं नाव घेतले जात आहे. मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांकडून याप्रकरणात न्यायासाठी एल्गार केला जात असतानाच, देशमुखांच्या धमकावले जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय.
मनोज जरांगे वंजारी समाजाला टार्गेट करत आहेत
मनोज जरांगे यांच्या या आरोपांनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा मैदानात उतरले आहेत. मनोज जरांगे वंजारी समाजाला टार्गेट करत असल्याचा पलटवार हाके यांनी केला आहे. त्यांनी जर ओबीसी समाजाला लक्ष्य करण्याचे काम सुरूच ठेवले तर आम्हीही त्यांना रोखठोक उत्तर देऊ, असा इशारा हाके यांनी जरांगे यांना दिला आहे.
पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तापण्याची शक्यता
एकंदरीतच, संतोष देशमुखांच्या हत्येनंतरच्या धमक्यांवरुन मनोज जरांगेंनी थेटपणे धनंजय मुंडेंना लक्ष्य केल्याचे दिसतंय. त्यामुळे मस्साजोगप्रकरणावरुन पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तापण्याची शक्यता निर्माण झालीय.. हे प्रकरण आता सरकार कसे हाताळते? धनंजय मुंडेंचे पुढे काय होते? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
अजितदादा प्रकरणाची व्याप्ती समजावून घ्या, धनंजय मुंडेंना सरकारबाहेर काढा, सुरेश धस आक्रमक
अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे.ते कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत. पण त्यांनी प्रकरणाची व्याप्ती समजून घेऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिनखात्याचा मंत्री तरी केले पाहिजे, अशी मागणी केली. रेल्वेचा एक अपघात झाला म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला, मुलीच्या गुण वादावर निलंगेकर यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले, मुंबई बॉम्बस्फोटावेळी आर आर पाटलांचा एक शब्द चुकला म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला, विलासराव देशमुखांचे मुख्यमंत्रिपद पद गेले, असा राजीनाम्यांचा इतिहास सांगून नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.